मराठी साहित्य व मुद्रणयुग - लेख | Marathi Literature and Printing Age - Article | Marathisahitya.in

          

          सर्वप्रथम मुंबईच्या गणपत कृष्णाजी भंडारी या गृहस्थाने १८३० साली त्या काळाचे पहिले पंचांग मुद्रण केले. नंतर त्यांनी पुढे संत एकनाथांचे रुक्मिणी स्वयंवर, दादोबा पांडुरंग यांचे मराठी व्याकरण, नाना नारायण यांचे मराठी नकाशाचे पुस्तक, गंगाधरशास्त्री फडके यांचे मराठी भाषेचे व्याकरण इत्यादी पुस्तके छापली. नंतर १८४३ मध्ये त्यांनी छपाईचा कारखाना सुरु केला.

         'पुणे पाठशाळा छापखाना' हा पुण्यातील सर्वप्रथम छापखाना होय. नंतर मित्रोदय नावाने अजून एका छापखान्यास सुरुवात झाली. या छापखान्यामध्ये मराठी भाषेतील अनेक धार्मिक ग्रंथांचे मुद्रण झाले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत रामदास, मोरोपंत यांच्या अनेक रचना पुस्तकाच्या रुपात अवतरल्या. नंतर नियतकालिके सुरु झाली व त्यांमधून लोकांना सर्व क्षेत्राविषयी माहिती समजू लागली.

           नंतर बऱ्याच प्रसिद्ध इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्यात आले. व भाषांतर करणाऱ्यास पुरस्कार देण्यात आले त्यामूळे अनेक पुस्तकांचे भाषांतर होऊ लागले.

            मेजर कँडी हे पुण्याच्या पाठशाळेचे मुख्याधिकारी होते. मेजर कँडी यांनी मराठी पुस्तकांच्या छपाईसाठी अनेक नियम लागू केले. कोणतेही पुस्तक पाहिल्याशिवाय छापायचे नाही मग ते प्रौढांसाठी असो किंवा शालेय असो असे त्यांनी सांगितले. त्यांनी मराठी भाषेतील अनियमितपणा काढून भाषेला बंदिस्तपणा आणला. मराठी भाषेचे विरामचिन्हे वापरण्याची पद्धत त्यांनीच सुरु केली. नंतर जसजसा काळ जाऊ लागला तसे छपाईचा कारखान्यांची संख्या वाढली व त्यामुळे साहित्याप्रसाराला आणखी मदत मिळाली.

(संदर्भ - नवसाहित्य आणि नवसाहितोत्तर साहित्य - प्रा. वसंत आबाजी डहाके)