चित्रकाराचे बक्षिस | अकबर बिरबल मराठी कथा | Akbar Birbal Marathi Story

        अकबराचा नवरत्न दरबार हा नेहमीच विद्वान आणि चतुर व्यक्तींनी भरलेला असायचा. त्यामध्ये बिरबलाचे स्थान सर्वात वरचे होते. बिरबलाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक कठीण समस्या सहज सोडवल्या आहेत. आजच्या 'चित्रकाराचे बक्षीस' या कथेत आपण पाहणार आहोत की, जेव्हा एका कलाकाराच्या कलेचा अपमान झाला, तेव्हा बिरबलाने आपल्या चातुर्याने त्याला न्याय कसा मिळवून दिला आणि टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर कसे दिले.

         अकबराचा नवरत्न दरबार होता. त्यात बिरबल अतिशय हुशार, चतुर, हजरजबाबी होता.
         एकदा बादशहाच्या दरबारात एक चित्रकाराला त्याने काढलेले अत्यंत सुंदर चित्र पाहून अकबर त्याच्यावर खुश झाला व त्याला मोठे बक्षीस देण्याची घोषणा केली. परंतु काही मत्सरी दरबारातील लोकांना हे आवडले नाही व त्यातील एक जण अतिशय हुशारीने म्हणाला 'जहापनाह, चित्र अतिशय सुंदर आहे परंतु इतके मोठे बक्षीस देण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचे मतही आपण आजमावून पहावे.'
           "ते कसं शक्य आहे ?" बादशहा म्हणाला.
          'सहज शक्य आहे जहापनाह हे चित्र महालाबाहेरील चौकात लावा कुणीही ते पाहू शकेल ज्याला त्या चुक सापडेल तेथे तो फुली मारेल.' दरबारातील लोकांनी सल्ला दिला. चित्र चौकात लावले गेले आणि चित्रकाराचा जीव टांगणीला लागला. जो तो जाता येता चित्र पाहून फुल्या मारू लागला पाहता पाहता संपूर्ण चित्र फुल्यानी भरले. चित्रकाराला वाईट वाटले बक्षीस तर मिळालेच नाही परंतु सुंदर चित्र वाया गेले तो बिरबलाकडे गेला व बिरबला सांगितले. 
           बिरबलाने त्याला तसेच हुबेहूब दुसरे चित्र काढायला सांगितले आणि बादशहाच्या संमतीने ते पुन्हा चौकात लावले. फक्त यावेळी चित्राखाली एक वाक्य लिहिले, 'जो असेच हुबेहूब चित्र काढू शकतो फक्त त्यानेच फुले मारावी.' नंतर चित्रावर एकानेही फुले मारली नाही. व चित्रकाराला मोठी रक्कम बक्षीस मिळाली.

तात्पर्य: चुका काढणे सोपे असते, पण त्याच दर्जाचे काम करून दाखवणे कठीण असते.